येवला तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट; पाण्याअभावी हजारो हेक्टरवरील कांदा जळून खाक!
परतीच्या पावसाच्या आशेवर केलेली लागवड ठरली शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकट; एकरी ४० ते ५० हजारांचा खर्च वाया
येवला [गोरख घुसळे] : येवला तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाण्याअभावी तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक जळून खाक झाले आहे. मोठ्या आशेने आणि पदरमोड करून कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात आता निराशेशिवाय काहीच उरले नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतीच्या हंगामासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

यंदा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामापासूनच शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, परतीचा पाऊस चांगला होईल आणि जमिनीतील ओलाव्याच्या आधारावर कांद्याचे पीक घेता येईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकऱ्यांनी रोपे तयार करणे, जमिनीची मशागत करणे, खते खरेदी करणे आणि कांदा लागवड करण्यासाठी मोठा खर्च केला. एक एकर कांदा लागवडीसाठी रोपे, खते, औषधे, मशागत, मजुरी आणि लागवड असा मिळून साधारण ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च आला.
मात्र, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लागवड केलेल्या कांदा पिकाला पावसाने दगा दिला. परतीच्या पावसाची प्रतीक्षा करत असतानाच पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला. विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांमध्येही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कांदा पिकाला पाणी देणे शक्य झाले नाही. परिणामी, पाण्याअभावी कांद्याची रोपे सुकू लागली आणि पाहता पाहता उभे पीक जळून खाक झाले. अनेक ठिकाणी शेतातील कांदा पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
आधीच शेतीचा वाढता खर्च, खतांच्या आणि औषधांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे वाढते दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच हजारो रुपये खर्च करून उभे केलेले कांदा पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. उत्पादन मिळण्याची आशा मावळल्याने बँकांचे कर्ज, खते-औषधांची उधारी आणि पुढील शेतीच्या खर्चाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

येवला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, शेती आणि शेतकऱ्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. शासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत. पाणीटंचाईग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
“परतीचा पाऊस चांगला होईल, या आशेवर आम्ही कांद्याची लागवड केली. रोपे तयार करण्यापासून ते लागवडीपर्यंत मोठा खर्च केला. एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च झाले; मात्र पाण्याअभावी संपूर्ण पीक डोळ्यांदेखत जळून गेले. आता खर्चही वसूल होणार नाही. घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा मोठा प्रश्न आहे.”संतोष वैद्य कांदा उत्पादक शेतकरी अंकाई
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
कांदा पिकाचे तातडीने पंचनामे करावेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत द्यावी.
पीकविम्याची नुकसानभरपाई त्वरित मिळावी.
दुष्काळी भागात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन करावे.
शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी सवलत द्यावी.
पुढील हंगामासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
मुख्य संपादक – गोरख घुसळे मो.न. 9421600903

✍मुख्य संपादक – गोरख घुसळे





















